Friday, 19 February 2021

श्री छत्रपती शिवाजी महाराज

 *आज*


*१९ फेब्रुवारी*



*युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती*


छत्रपति शिवाजी महाराज 

(१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०).

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.

शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.


निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले

छत्रपती शिवाजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तम रीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.


पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. तसेच सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. मुंबई–लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात (१६ जानेवारी व १४ फेब्रुवारी १६७८) अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महराजांची तुलना करण्यात आली आहे. मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे.


खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत.


जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत असे.’ महाराष्ट्रेतर कवींनी–विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात –


निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु


अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.


दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे, या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा-ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही.

महाराजांना विनम्र अभिवादन..!

संकलन,शब्दांकन 



No comments:

Post a Comment

मदर तेरेसा.. गाथा बलिदानाची

🇮🇳 गाथा बलिदानाची🇮🇳                                                                                    महान समाज सेविका         भारतरत्न...